Friday, November 14, 2014

फ्रॉम द यूथ हार्ट


जमुना के तीर...

राग भैरवी... भीमसेनजी गात आहेत... 

सकाळची वेळ...

मन-डोके दोन्हीही शांत. तरीही मनातली चलबिचल काही केल्या थांबत नाही. मन-बुद्धी यांतील द्वंद पुन्हा सुरू होते... त्याने शांतता भंग होऊन कधी गाणे बदलते कळतही नाही. पुढे वाढून ठेवलेली कामे आठवतात... गोंधळ उडतो... वेळ महत्वाचा असतो, तो दवडून चालत नाही. तरीही 'मेडिटेशन' केल्याशिवाय बाहेर पडू नये असं वाटतं. मग आमीर खाँ यांचा 'मालकंस' लावून मन एकाग्र करण्याचा प्रयत्न होतो... मेडिटेशन-पुर्वीच्या योगातील एक-दोन आसने उरकल्यावर पुढील प्रक्रिया करावीशी वाटत नाही, कारण वेळ जात आहे असे वाटत असते.

अशाप्रकारे सर्वच अर्धवट सोडून संपूर्ण दिवस अर्धवट जगणारी आमची तरूण पिढी वेळेमागे धावत आहे. यात आमचा दोष नव्हेच. काय करणार? संपूर्ण जगंच वेगवान झालंय. स्थिरता नष्ट झाली आहे. पायाला भिंगरी लागली आहे. अशा वेगवान स्पर्धात्मक जीवनात 'मल्टीटास्किंग' शिवाय पर्याय तरी कुठंय? तद्दन मटेरिअलिस्टिक जगात अडकल्याने पुस्तक-साहित्य वाचनाकडे जवळपास संपूर्णच दुर्लक्ष होत आहे - ज्याने आपलीच सांस्कृतिकता झाकोळली जात आहे - हेही जाणवत नाही

हे सगळं कुठल्या एका तपापासून-दशकापासून नाही तर आत्ता-आत्ता गेल्या काही ३-४ वर्षापासून. याच ३-४ वर्षांपासून भारताच्या राजकीय पटलावर वेगवान वारे सुटत आहेत. स्कॅमवर स्कॅम, निवडणूका, हेवेदावे यांनीच प्रत्येकाला घेरले आहे. माणूस खुपच जास्त 'पॉलिटिकल', 'मटेरिअलिस्टिक' होत आहे. उदाहर्णाथ नुकतीच पु. लं. देशपांडे यांची पुण्यतिथी झाली. पूर्वी पुण्या-मुंबईत यानिमित्ताने शेकडो कार्यक्रमांचे आयोजन होत असे. लोक एकत्र जमत. पु. लं. च्या आठवणीत पोटभर हसत. यंदा मात्र लोकांनी फेसबुकवरंच अभिवादन करून समाधान मानले.

पु. लं. वरून पुस्तके आठवली. काय अफाट आवड होती नाही पूर्वी वाचनाची? विषय खोलवर जावून पाळेमुळे समजावून घेण्यात पुस्तकांची मदत होत असे. आता एवढा वेळ नाही आम्हाला. थोडक्यात कशी माहीती मिळेल सांगा. हवे तर कुणाचे अगदी अर्ध्या-एक तासाचे व्याख्यान आयोजित करा. नाहीतर डॉक्युमेंटर्या-लघुपट दाखवा. चित्रपट काढला एखादा त्या विषयावर तर मस्तचं. म्हणजे वीकएंडला बर्यापैकी मनोरंजन तरी होईल आणि यांपैकी काहीही होत नसेल तर मग ऑडिओ-बुक सापडलं तर ऐकतो. पण पुस्तक नको बाबा!

संजय बारूंनी काँग्रेसची चिरफाड केली त्यांच्या पुस्तकात असं ऐकलंय. त्यानंतर पी. सी. पारेख यांनीही. मग कॅगहिरो विनोद राय, नटरवरसिंग इत्यादींनी तर सुरूंगच लागला अक्षरशः काँग्रेसला. पण मुळात जावून विषय नक्की काय, हे जाणून घेण्यासाठी पुस्तक आम्ही वाचू शकत नाही हो! कारण वेळच नाही. समिक्षण वाचतो आम्ही काहीवेळा आणि न्यूज चॅनेलवाले दाखवतातंच ना! क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरनेही ह्या आत्मचरित्रांच्या सीझनमध्ये पुस्तक प्रकाशित केले. खरे तर त्याच्या इनिंगसारखी उत्सुकता पुस्तकाविषयी नाही. पण चॅपेल यांना मारलेली 'चप्पल' कुतूहल जागवून गेली. वाचलं असतं पुस्तक पण हर्षा भोगले यांचा रिव्ह्यू वाचून कळाले सर्व त्यात काय असेल तर. मग हेही नको. राजदीप सरदेसाई यांचे '२०१४ इलेक्शन' हे पुस्तक तर आमच्या खिजगिणतीतही नव्हते. बरं झालं मित्राने सांगितलं. पण तरीही वेळ का घालवायचा? आम्ही आमच्या डोळ्यांदेखत निवडणूक होतांना बघितली आहे.

एवढंच नव्हे तर वेळ वाचावा म्हणून अण्णांनी चालू केलेल्या जनलोकपाल आंदोलनातून काढता पाय घेतला आणि ठरवले वेळखाऊ, रक्तरंजित (बरे याची गरज नाही पडली) क्रांतीपेक्षा मतदान करून क्रांती घडवू. घडवली सुद्धा. मतदान ५ मिनिटांचे पण आंदोलनाने चक्क १९ दिवस खाल्ले. तरीही पदरात काही पडलं नाही. म्हणूनच सुफरफास्ट, 6जी असलेले मोदी आम्हांस प्रिय. ते कितीही संयमी असले तरी आम्ही संयमी नाही. संयम पाळला तरी वेळ जातो. म्हणूनच त्यांना पंतप्रधान केलं ना! स्वच्छता मोहिमेतही वेळ वाचवा म्हणून आम्ही स्वतः गेलो नाही. आजी-आजोबांना पाठवले कारण त्यांना बराच वेळ होता. मात्र झाडू हातात घेत आम्ही फोटो काढले आणि फेसबुकवर अपलोड केले.

आजकाल दिवाळी साजरी करायलाही वेळ मिळत नाही. पूर्वी परिक्षा असायच्या. आता नोकरी असते. कार्यरत राहणे हाच आमचा 'प्राईम मोटिव्ह'. शेवटी कर्म हेच तर कलयुगातलं शस्त्र. पण दिवाळीतला मित्रांना दाखवायला एक तरी फोटो असावा म्हणून लक्ष्मीपूजनाला तब्बल चार तास आई-बाबा-छोटीसोबत घालवले. फटाके उडवणे तर कधीच सोडलंय. प्रदूषण होतं. आजकाल फेसबुक-व्हॉट्सअपवरच उडवतो. ते वाचलेले पैसे कुठल्यातरी अनाथ किंवा वृद्धाश्रमाला देण्याचा विचार होत. पण दुसर्या दिवशी मित्रांसोबत मॅटिनीचा प्लॅन असल्याने स्वतः जाऊ शको नाही तर एजंटमार्फत....सॉरी सॉरी एन्.जी.ओ. मार्फत पाठवले. कुणालाही वेळ नसल्याने फराळ यंदा घरी बनवलाच नाही. रेडिमेडच आणला. कॉलनीत थोडा वाटला. कुलकर्ण्यांचा दरवेळी इतरांपेक्षा हटके असायचा. मात्र त्यांनीही रेडिमेडच आणला. सारखी तीच चव असल्याने खाल्लाच नाही.

सभोवती घडणार्या घटनांना आम्ही परिक्षेचा निकष लावतो. कितीही गंभीर बाब असली तरी परिक्षेच्या उपयोगाची नसेल तर दखलही घेत नाही. कितीही अॅनॅलिसिस करण्याचा प्रयत्न केला तरी ते निःपक्षपाती होतच नाही (पण तसे वाटत राहते) कारण संवेदनाच बोथट झाल्या आहेत. आपला मुद्दा कितीही योग्य, वैध असला तरी ठोकठाक केल्याशिवाय मांडता येत नाही. असले काहीही न करताही तो लोकांना पटू शकतो. पण निर्णय झटपटच हवा असेल तर ठोकठाकीशिवाय पर्यायही सापडत नाही. कारण वेळच नाही.

'कब्बडी लीग' म्हणजे खरंतर क्रांतीच होती. कारण प्रथमच कब्बडी खेळाडूंना एवढं मोठं व्यासपीठ उपलब्ध झालेलं. राष्ट्रीय खेळाची पात्रता असणार्या कब्बडीची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली जात होती. पण जाणीवपूर्वक दूर्लक्ष करणे आम्ही अवलंबले. आत्तापर्यंत आम्ही कब्बडीला प्रोत्साहन द्या म्हणून टाहो फोडत होतो. मात्र आता खेळायलाच वेळ नाही तर बघणार कोठून? याप्रमाणेच फुटबॉलच्या इंडियन सुपर लीगचेही झाले. काय वेड होतं शाळेत असतांना फुटबॉलचं. पण भारतात फुटबॉलला भविष्य नाही म्हणून तेही मागे पडलं. सुपरलीगने व्यासपीठ मिळवून दिलं पण आता काय? वेळच नाही हो. म्हणून हे सगळंच 'ब्लडी मनी ड्रेनिंग'...

विश्वनाथन आनंद हा आमचा रोल मॉडेल. आजही आहेच. त्याच्यासारखं शांत-संयमी (आणि प्रसिद्धही) व्हावसं वाटतं. पण त्याचे बुद्धिबळाच्या पटावरचे निरपेक्ष-निरागस डावपेच कितीही आवडत असले तरी आम्हास आमच्या अस्तराखालचा बेरकी राजकारणी स्वस्थ बसू देत नाही. हेच डावपेच तो आम्हास रोजच्या जीवनात आपल्याच माणसांसोबत खेळण्यास भाग पाडतो. पण कार्लसनही तेवढाच भावतो. तरूण-तडफदार असा कार्लसन आनंदलाही घाम फुटायला भाग पाडतो. म्हणूनच तो ह्रदयाच्या अगदी आतल्या कोपर्यात असला तरी आनंदचा विजयच आम्हास आल्हाददायक ठरतो. कारण आम्ही कितीही असंयमी, बेजबाबदार असलो तरी प्रथम आमच्या देशावर जीवापाड प्रेम करतो.

तरीही आम्हांस देशाचा  इतिहास माहीत नसतो. आम्ही काही वेळेस स्वातंत्र्यसैनिकांना एकमेकांत विभागूनभल्या मोठ्या भिंती उभ्या करून घेत असतो. मग कुणीतरी आम्हांस सांगणारं हवं असतं की स्वातंत्र्यसैनिक तुझा-माझा नसतो. तो देशाचा असतो. हे सगळं जरी असलं तरी आम्हा मित्रांत जाती-धर्म-पंथ भेद नसतो. आम्ही सगळे देशासाठी एक असतो.

आमचा स्वभाव मुळातच मुक्तछंदी... बंधने सहसा सहन होत नाहीत. ती तोडण्यातच धन्यता मानतो. तरीही वडिलधार्यांविषयी आदरयुक्त भिती कायम असते. जागतिकीकरणाचे हे युग स्वस्थ बसू देत नाही. अख्खे जग फिरून पालथे घालण्याची आस मनात कायम असते. 'कोलंबसचे गर्वगीत' आजही तनामनात तेवढीच ऊर्जा निर्माण करते. इतर कुठल्याही देशात रहात असलो तरी मॅडिसन स्क्वेअरवरील मोदींचे भाषण परदेशातही ताठ मानेने जगण्यास आणि भारतीय असण्याचा अभिमान निर्माण करते.
जाता जाता एकच सांगतो वेळ अजिबातच नाही. पण मिळाल्यास नक्की वाचन करेन.

आपलाच,
भारतीय तरूण.

No comments:

Post a Comment