नारायणभाई देसाईंचे ‘अज्ञात गांधी’ हे ‘समकालीन’ प्रकाशित पुस्तक काही महिन्यांपूर्वी वाचनात आले. बापूंचे विचार तरुणांपर्यंत पोहोचावेत म्हणून नारायणभाईंनी गांधीकथा सांगायला सुरुवात केली. देशांतल्या अनेक गावोगावी फिरत त्यांनी गुजराती, हिंदी, इंग्रजी, आसामी व बंगाली अशा अनेक भाषेत व्याख्याने सुरू केली. भारतातच नव्हे तर भारताबाहेरही कथा त्यांनी सांगितल्या. ह्या सर्व कथांचे संकलन म्हणजे ‘अज्ञात गांधी’ हे पुस्तक.
गांधीजींच्या जन्मशताब्दीनिमित्ताने ग. दि. माडगूळकरांनी रचलेल्या ‘बापू सांगे आत्मकथा’ ह्या गीतापासून प्रेरणा घेत नारायणभाईंनी कथाकथनास सुरुवात केली. ह्या पुस्तकाचे मराठीत रूपांतरण सुरेशचंद्र वारघडे यांनी केले आहे.
‘अज्ञात गांधी’ पुस्तकातून खरोखरच सामान्य जनांत अज्ञात असलेले गांधी समोर येतात. गांधीच्या जीवनातील आणखी नवनवीन पैलू उलगडत जातात. गांधीच्या दांडग्या जनसंपर्कामागील रहस्य ह्या पुस्तकातून कळते. त्यांच्या जीवनातील काही रोमांचक किस्से कळतात. अहिंसेच्या मार्गावर आपले संपूर्ण जीवन व्यतीत केलेल्या गांधीजींचा निर्भीड, भेदक व परखड स्वभाव ह्यातून कळतो.
उत्तमचंद गांधी म्हणजे गांधीजींचे आजोबा. त्यांना सगळे ‘ओता’ गांधी ह्या नावाने ओळखत. पोरबंदर संस्थानचे जकात अधिकारी म्हणून ते काम पाहत. पोरबंदर संस्थान व जुनागडचा नवाब यांच्यातील सीमावाद मिटवण्यात ओता गांधींचा बराच मोठा वाटा होता. दोन्ही संस्थानात मित्रत्वाचे नाते निर्माण केले. याने पोरबंदरचा राणा खूष झाला व ओतांची नेमणूक दिवाणपदी केली. 1831 साली पोरबंदरचा राणा मरण पावला. त्याची पत्नी रूपाली अधिकारपदावर बसली. राणी कानाने हलकी असल्याने बर्याच लोकांनी गैरफायदा घेतला. खजिनदार खिमजींकडे काही दासींनी अधिक पैशांची मागणी केली. सगळा हिशोब ओतांकडे होता. त्यांच्या परवानगीशिवाय कुठलाही व्यवहार होत नसे. खिमजीने दासींची ही अवाजवी मागणी फेटाळली. दासींनी रूपालीचे कान भरले व खिमजीला तुरुंगात डांबण्याचे फर्मान काढले. त्याने खिमजी आश्रयाला ओतांच्या घरी धावला. ओतांनी आपल्या सगळ्या कुटुंबियांना खिमजीभोवती वर्तुळ करून बसण्यास सांगितले व खिमजीला धक्काही लागण्याअगोदर आमच्या प्राणांवर चालून जावे लागेल असे बजावले. याने रूपाली नरमली. खिमजीला सोडले पण ओतांची संपत्ती घरदार जप्त केले.
येथूनच महात्मा गांधीची शरणागत निरपराध माणसासाठी बलिदान देण्याचे धडे गिरवण्यास सुरुवात झाली.
त्यानंतर ओता गांधींना जुनागढच्या नवाबाने पाचारण केले. तेथे गेल्यावर ओता गांधींनी नवाबाला ‘डाव्या’ हाताने सलाम केला. तेव्हा नवाबाने उजव्या हाताने सलाम करण्याचे संकेत मोडून डावा हात वापरल्याचे कारण ओतांस विचारले. त्यावर ओतांचे उत्तर मोठे विहंगमय होते. ते म्हणाले, ‘उजवा हात अद्यापि पोरबंदरच्या सेवेत अडकल्याने डाव्या हाताने सलाम केला.’ यावर खुश होत नवाबाने त्यांना महालाचे दरबारीपद देऊ केले.
1841 साली रूपालीचे निधन झाले. त्यानंतर गादीवर आलेल्या तिच्या मुलाने ओतांना पुन्हा बोलावणे पाठवून दिवाणपद देऊ केले. परंतु ते नाकारून त्यांनी आपला स्वाभिमान जपला. परंतु मग राणीने त्यांचा कुशाग्र मुलगा करमचंदला दिवाण बनवले.
अशा अनेक घटनांमुळे गांधींची जडणघडण होत गेली. राजकोटच्या ठाकोरच्या दरबारीही गांधी परिवाराने आपली सत्यनिष्ठता व निर्भयता दाखवली. करमचंद म्हणजे कबा गांधीनीही वाकानेरच्या संस्थानात आपली स्वच्छ व पारदर्शक वृत्तीचे दर्शन घडवले. वाकानेरच्या संस्थानिक कबांना दहा हजारांची बक्षीसरूपी लाच देतांना म्हटले, ‘‘दिवाणसाहब, शर्त भंग की बात छोड दो। थोडा सोच लो। आपको दस हजार देनेवाला मेरे जैसा कोई नही मिलेगा।’’ त्यावर कबा उत्तरतात, ‘‘आपको मेरे जैसा दस हजार ठुकरानेवाला कभी नही मिलेगा।’’
चंपारण्य लढ्याच्यापूर्वी दोन ते तीन वर्षे अगोदर कुठलातरी एक साधा शेतकरी काँग्रेस अधिवेशनात आलेला असता आपली व्यथा कुणापुढे मांडावी ह्या गोंधळात अडकतो. तेव्हा त्याला आजूबाजूचे सगळे उंची कोट परिधान केलेले तसेच पांढरी स्वच्छ घातलेले लोक दिसत होते. ही लोक आपली व्यथा ऐकतील का? असा प्रश्न त्याला पडतो मग त्याला एक काठीयावाड पगडी घातलेला अंगावर साधा सदरा व धोतर घातलेला अगदी आपल्यातलाच वाटणारा माणूस दिसतो. तो त्या व्यक्तीजवळ जाऊन त्यांना आपली व्यथा सांगायला परवानगी मागतो. तेव्हा काठियावाड वेशातील गांधी हसत त्याला सांगतात, ‘मी तुमच्यासाठीच येथे आलोय.’ तेव्हा तो शेतकरी अतिशय भांबावतो व गांधीजींच्या पाया पडत ढसाढसा रडतो. गांधीजींच्या शब्दांनी सुखावलेला तो माणूस त्यांना चंपारण्यातील ब्रिटिशांच्या जुलुमाविषयी कळवतो व गांधींकडून आश्वासन घेऊन परततो आणि गांधीजी काही काळाने खरंच तेथे जाऊन ठेपतात त्यानंतरचा लढा व गांधीजींची निर्भयता ही अतिशय मोहनीयरीत्या पुढे मांडलेली ह्या पुस्तकात आढळते.
गांधीजी कसं संपूर्ण जगाला आपलंसे करत होते व सारे जग कसे गांधींवर प्रेम करायला लागले, याची प्रचिती देणारे पुस्तक म्हणजे अज्ञात गांधी. गांधीवर अनेक प्रकारचे उथळ आरोप करणारी लोके भारतात आजही आहेत.
त्याविषयीची द्वेषभावना आजही आहेच. मात्र या सगळ्या लोकांचे मत परिवर्तन करण्याची क्षमता ह्या पुस्तकात नक्कीच आहे. महात्माजींचा हृदयपरिवर्तनावर केवढा विश्वास होता हे सांगण्याचंही काम हे पुस्तक करतं. आफ्रिकेत गांधींवर हल्ला करणार्या मीर आलमपासून ते गुरुदेव टागोरांना अचंबित करणारे गांधीजी ह्या पुस्तकातून आपल्या समोर येतात.
नारायणभाईंनी इक्वेडोर देशात भेटलेला माणूस शेकहॅण्डसाठी दिलेला हात सोडायला तयार होत नाही. कारण महात्माजींच्या सहवासात राहिलेल्या माणसांच्या हातातून तो गांधीच्या स्पर्शाची लहर अनुभवायची म्हणून असे करतो हे वाचून आश्चर्यचकित झाल्यावाचून राहवत नाही. तसेच अमेरिकेतील अहिंसावादी नेता सीझर चावेज आपली सगळी कामे रद्द करून नारायणभाईंच्या सहवासात चर्चा करत राहिला हे व असे अनेक प्रसंग महात्म्याचे माहात्म्य सांगून जातात. काही प्रसंग तर डोळ्यात पाणी आणणारे आहेत.
नारायणभाईंनी राजकीय महात्मा लोकांसमोर न मांडता लोकनेता व दयाळू, नम्र, जिंदादिल असे गांधीजी मांडण्याचा प्रयत्न ह्या पुस्तकातून केला आहे. गुरुदेव टागोरांपासून आंबेडकर, नेताजी बोस ह्या सगळ्यांशी असणारे सलोख्याचे नाते कसे नारायणभाई सांगतात.
कॉपीराईटस्मुळे सगळे प्रसंग इथे मांडण्याला मर्यादा पडते. वरील नमूद केलेल्या प्रसंगांपेक्षाही अधिक अचंबित करणारे प्रसंग पुस्तकात वाचायला मिळतील. प्रत्येकाने गांधीवाद्यांनी गांधीविरोधकांनी व अगदी उजव्या-डाव्यांसकट नक्षलवादी दहशतवाद्यांनीही वाचावे असे हे पुस्तक आहे.
Mast Lihila Ahes Dada.. Interpretation skills apratim ahe tuza ! Lavkarach Wachel mi te book.
ReplyDelete