शब्दांची मोडतोड, वाक्यांची मोडतोड करून एक नवीनच ‘इंडिजिनस’ भाषाशैली निर्माण करून प्रचलित लेखनाची परंपरा मोडीत काढत फक्त महाराष्ट्रभरच नाही तर देशभर लौकिक पावलेले लेखक म्हणजे भालचंद्र नेमाडे. ‘अफलातून तर्हेवाईक व्यक्ती म्हणून मराठी वाचकवर्ग नेमांडेकडे पाहतो. समीक्षणाचीही चौकट मोडीत काढत नेमाडेंनी अनेक मर्मग्राही लेखन केले आहे. वयाच्या अवघ्या पंचविसाव्या वर्षी 70 पासून आजच्या दशकातील तरुण पिढीलासुद्धा प्रभावित करणारी ‘कोसला’ सारखी कादंबरी लिहून साहित्यक्षेत्रात एक मैलाचा दगड निर्माण केला/ठरला.
‘कोसला’ एक विद्रोह आहे. बंड आहे. तरीही तो विद्रोह. ते बंड हे स्वत:शीच होते. पंचविसाव्या वर्षी कुठला एक तरुण कादंबरी लिहीत असावा आणि तेही नेमाडेंसारखा तर त्यात येणारी उन्मुक्तता, उन्माद, बंडखोरीवृत्ती त्याचसोबत येणारी हतबलता, तरीही झगडण्यासाठीची ऊर्मी प्रकट होणे अटळच. कधी कधी विचार करत बसतो स्वत:शीच की कोसलातला पांडुरंग सांगवीकर सारखी ह्या समाजात किती तरुण असावेत. तर आपल्या प्रत्येकातच कुठे ना कुठे तरी पांडुरंग सांगवीकर आहेच, हे थोडा विचार केल्यावर लक्षात येते. विद्रोह हा शेजारूनच जन्माला येत असतो. व तो तुमच्या हातून कादंबरीस्वरूपात उतरेपर्यंत संपत नसतो. हेच नेमाडे असावेत. बहुतेक समाजाशी विद्रोह की स्वत:शीच हा गोंधळ ‘कोसला’ ने दूर केला. कोसलावर जेवढी टीका झाली असावी तेवढी मराठी साहित्याच्या इतिहासात फारच कमी लोकांच्या, कादंबर्यांच्या वाट्याला आली असावी. ह्याच टीकेने ‘कोसला’ला अजरामर केले. कोसलाच्या शेवटाला 50 वर्षे पूर्ण झाले असता लिहितांना नेमाडे सांगतात की, आजारपणामुळे नेमाडे दोन दिवसांकरता हॉस्पिटलाईज्ड झाले. डिसचार्ज मिळाल्यावर हॉस्पिटलच्या पायर्यांवर नेमाडेंना त्यांचा एक जूना मित्र भेटतो. भेटल्या भेटल्या म्हणतो, ‘भालचंद्र तू मेला असतास तरी चालते असते. तुला, नाहीतरी कोसलाने अजरामर करून ठेवलंय.
नेमाडे मुळातच फटकळ स्वभावाचे. (हा स्वभाव सभोवतालच्या समाजातूनच निर्माण होत असतो.) त्यामुळे अनेक शत्रू निर्माण झालेले पाश्चात्त्य लिखाणाचे साहित्याचे अनेकवेळा गोडवे नेमाडेंनी गायले आहेत. परंतु भारतीय लेखनशैलीत असलेल्या पाश्चात्त्य वर्चस्ववादी वृत्तीला त्यांचा प्रखर विरोध आहे. ते कादंबरीकार म्हणून जेवढे प्रसिद्ध आहेत तेवढेच देशीवादाचे प्रवर्तक म्हणून लौकिकप्राप्त आहेत. आजकाल तर त्यांच्या देशीवादाचे गोडवे शिमल्यातील रहिवासीही गातात.
गेल्या वर्षात पुस्तकप्रेमी, संग्राहक व साहित्य अभ्यासक शशिकांत सावंत यांनी ‘बुकगंगा डॉट कॉम’ ने आयोजित केलेल्या कार्यक्रमात नेमाडेंची मुलाखत घेतली होती. त्यात सावंत यांनी नेमके व मार्मिक प्रश्न विचारत नेमाडेंना बोलते केले. नेमाडे बोलतांना म्हणाले की, ‘माझी बंडखोरी संपलेली नाही. मी अजूनही नवनवीन लेखकांचे साहित्य, विशेषत: कविता वाचत असतो. त्यावरून माझी खणखणीत मते बनतात. पण मी ती व्यक्त करायचे टाळतो. कशाला उगीच कुणाला दुखवावे असे मला वाटते. मी पूर्वी ज्येष्ठांवर लिहिले, समवयस्कांवर लिहिले. ते कडाडून लिहिले त्यामुळे खूप असंतोष तयार झाला. पण त्यावेळी संबंधित लेखकांच्या मनात तयार झालेल्या कटुतेची फिकीर मला वाटली नाही. आता या वयात तसे करू नये, नवीन लोकांना दुखवू नये असे वाटते.’
‘कथा तर दोन दिवसांत निर्माण होत असावी असा माझा समज आहे. पण कवितेचा शब्द तयार व्हायला महिना महिना लागतो. तुकारामाला काय यातना झाल्या असतील याची कल्पना देखील करवत नाही. ‘याचसाठी केला अट्टाहास’ या पंक्तीमधील ‘अट्टाहास’ या शब्दासाठी तुकाराम किती झगडले असतील याची कल्पनाही करवत नाही. अट्टाहास ही संज्ञा मूळ सैनिकी वातावरणातली आहे. तेथून ती फिरत फिरत ‘प्रयत्नसाध्य ते’ पर्यंत येऊन पोचली. तुकारामांच्या पद्यपंक्तीत त्या ठिकाणी अट्टाहासखेरीज दुसरा शब्द येऊच शकत नाही!’ यावरून आपणास लक्षात येईल नेमाडेंची एखादी अवघड गोष्ट सोपी करून सांगण्यात कसा हातखंडा आहे ते!
‘हिंदू’ बद्दल थोडं -
‘हिंदू’ जगण्याची समृद्ध अडगळ ही नेमाडेंची कोसलानंतरची बहुचर्चित कादंबरी हिंदू हा एक अणुबॉम्ब आहे. तो सहजासहजी पचत नाही. पचला तरी त्याचा अल्सर होण्याचा धोका असतो. तो पचवून जो तरतो त्यालाच ‘हिंदू’ काय आहे कळते आणि जे अल्सरच्या दुखण्याने उड्या मारतात त्यांना अधिक कळलेले असते. ‘हिंदू’हा नायक ‘खंडेराव विठ्ठल’ या कादंबरीचा महाराष्ट्रातील दोन महादैवतांची नावे असलेला मानववंश शास्त्रज्ञ. हवेने हवेवर लिहिलेल्या प्राचीन संस्कृतीचा इतिहास शोधायला निघालेला खंडेराव विसरतो किंवा काय? की तो स्वत:च त्या संस्कृतीचा भाग तर नाही ना? असेल तर मग शेजारी जे काही चाललंय तो माझ्या संस्कृतीचा भाग नाही. आणि जर आहेच तर मी अनंत कालापासून मृतच आहे. ही आहे ‘हिंदू.’
मला माहिती आहे वरचा मुद्दा कळायला अवघड आहे. यापेक्षाही किचकट, कईकपट किचकट ‘हिंदू’ आहे. हे वरचं ‘हिंदू’ कडूनच मिळालेलं. खानदेशातील मोरगावचा खंडेराव थेट लाहोरमध्ये उत्खनन व संशोधनास काय जातो. आठवणीतून अचानक वर्तमान, वर्तमानातून आठवणीत प्रवासातील स्वप्नातून जागृतीत हे सगळे ढीरपीळींळेपी अद्भुतच बुवा. ‘हिंदू’ मधील प्रत्येक पात्राला एक त्याची वेगळी कथा आहे. त्याचा इतिहास आहे. खंडेराव हिरो असला तरी त्याला स्वतंत्र अस्तित्व आहे. म्हणूनच नेमाडेंना अभिव्यक्ती जास्त प्रिय आहे. खरे तर फटकळ स्वभावाच्या माणसाला अभिव्यक्ती प्रिय असतेच. ‘हिंदू’ विषयी अधिक बोलणे टाळलेच. कारण तोही चिरकाल विषय आहे. म्हणूनच ‘ज्ञानपीठ’ त्यास ‘पात्र’ आहे.
नेमाडे व त्यांच्या साहित्यावर सध्या गप्पा हे संशोधनासमानच म्हणून अगदीच अर्ध्यावर सोडलंय असं वाटावं म्हणूनच मुद्दाम इथे सोडतो. बाकी उदाहरणार्थ नेमाडे वगैरे चालूच असतील.
(ज्ञानपीठ कधीच मिळायला हवा होता नेमाडेंना. महाराष्ट्र शासनाने कधी दखल घेतली नाही. मात्र हिमाचल प्रदेश सरकारने शिफारस करणे हे कौतुकास्पद!)
No comments:
Post a Comment