सबंध भारतवर्षात असा एकसुद्धा युवक सापडणे अवघड, ज्याला विवेकानंद ही व्यक्ती कोण हे जाणून घेण्यासाठी दुसर्याची गरज भासत असावी. त्या थोर आत्म्याला आपण ज्या स्वामी विवेकानंद नावाने ओळखतो ते नाव धारण केलेले शरीर जाऊन जवळपास शंभर वर्षे पूर्ण झाली आहेत. तरीही विवेकानंद व त्यांचे विचार हे आपल्याइतकेच तरुण वाटतात. अनेक थोर विचारवंत, पुढारी, साधु-संत होऊन गेलेत. काही अंशी मागेही पडलेत. प्रत्येक दशकातली-शतकातली तरुण पिढी त्यांना जे जे जुने वाटते ते-ते टाकून किंवा त्याला अद्ययावत करून पुढे सरकते. हे असे विवेकानंदांच्या बाबतीत मात्र घडतच नाही. त्याउलट विवेकानंद आपल्या तरुण पिढीला व आपल्या विचारांना अद्ययावत करत पुढे सरकण्यास भाग पाडतात, तरीही कोवळ्या वयात ‘विवेकानंदांचाच जन्मदिवस युवा दिन म्हणून का साजरा करायचा? त्यांनी युवकांसाठी असे काय केले असावे?’ असे विवेकानंदांनाच स्वत:त सामावून घेतांना उद्भवणारे प्रश्न माझ्यासाठी स्वाभाविक. शेवटी विवेकानंदांनीच मला बुद्धिनिष्ठता शिकवली. मग काय? असाच माझ्या युवामनाला आकार देणारा विवेकानंदांचा शोध सुरू झाला.
विवेकानंदांची पहिली ओळख झाली ती आमच्या फॅमिली डॉक्टरांनी मला दिलेल्या ‘राष्ट्राला आवाहन’ ह्या 80 पानी स्वामी विवेकानंदांच्या विचारांचे संकलन असलेल्या पुस्तकातून. पुस्तकाच्या सुरुवातीला स्वामीजींचे संक्षिप्त चरित्र दिलेले होते. ते वाचतांना साधारणत: इतर ढोंगी भगवावेषधारी लोकांविषयीचा तिटकारा जसा असतो (हवे तर लहानणी असणारी भीती म्हणा.) त्याचा लवलेशही जाणवला नाही. उलट त्या भगव्या रंगाचा व त्या वेषाचा व्यापक अर्थ त्या वयात लक्षात येऊ लागला. हा ‘क्लीन-शेव्हन्’ भगवावेषधारी बाबा ज्या प्रकारे भगवद्गीता वाचण्यापेक्षा फुटबॉल खेळा सांगत होता, त्याने अधिकच जवळचा वाटू लागला. कालकालपर्यंतचे बाबा लोक खूप प्रतिगामी भासायचे त्यामुळे आपले नि त्यांचे जुळायचे नाही. याचा अर्थ आम्ही धर्माबिर्मापासून दूरच बरे ही भावना बळावायला लागली होती. मात्र विवेकानंदांसाारखा पुरोगामी-विवेकवादी-बुद्धिनिष्ठ ‘माणूस’ (हे म्हणणे थोडे अवघड) जेव्हा मिळतो तेव्हा एवढ्या लाखो वर्षे जुन्या धर्माचा अर्थ उमगायला लागतो. त्याच पुस्तकातील एक भाग जसाच्या तसा सांगतो, ‘‘भारताच्या राष्ट्रीय जीवनरूपी संगीताचा ‘मूळ सूर’ धर्म असून तो ‘संपूर्ण विश्वाच्या आध्यात्मिक ऐक्याचा प्रसार करतो, आणि ह्या धर्माला जेव्हा दृढ प्रतिष्ठा लाभेल तेव्हा इतर सर्वच गोष्टी आपोआपच सुधारतील. पाश्चात्यांचे अंधानुकरण करणे, जुन्या भ्रामक समजुतींना वा रूढींना चिकटून राहणे, जातीविषयी संकुचित दृष्टिकोन बाळगणे - यांसारख्या गोष्टींसाठी ते आपल्या देशवासीयांची परखड कानउघाडणी करण्यास विसरले नाही.’’
अजून एक खूपच भावणारे वाक्य म्हणजे ‘आत्मनो मोक्षार्थ जगदहितायच.’ कुणाला आठवते का की कुणाही ऋषितुल्य विद्वानाने संन्यासाचा मार्ग पत्करतांना जगाला त्यासोबतच जगाच्या, इतर लोकांच्या हिताचा विचार करण्यास भाग पाडले असावे?’ उत्कट आध्यात्मिकता आणि सेवा, स्वत:चा मोक्ष आणि जगाचे कल्याण यांची सांगड घालणारे विवेकानंदच एकमेव ठरावेत. शिकागोत ऐतिहासिक भाषण करून परतल्यावर पूर्व आणि पश्चिम या एकमेकींना सहायक ठरोत आणि एकमेकींना सहकार देवोत हे स्वामींचे मत आणखी दृढ झाले. पाश्चात्त्यांचा केवळ भौतिक झगमगाट त्यांना दिपवू शकला नाही, तसेच भारताचा आध्यात्मिक मोठेपणा त्यांच्या समोर आपला सामाजिक व आर्थिक दुबळेपणा लपवू शकला नाही.
हेच आणि याहूनही अधिक ज्ञान जर हे 80 पानी पुस्तक देऊ शकते तर विवेकानंदांविषयी अजून वाचावयास गेल्यास आपण किती समृद्ध होऊ असे वाटले. मग ‘Complete Works of Swami Vivekanand’ नावाचे पुस्तकाचे ठोकळे वाचायला घेतले. साडेचार ठोकळे वाचले. त्यानंतरचे पुढचे पचत नव्हते. कारण माझ्या ज्ञानाच्या पदराचा आवाका लहान होता. मग काही काळ वाचलेल्यावरच चिंतन करण्यात घालवावा असे ठरवले.
काही वर्षांनी पुण्यातील रामकृष्ण मठात पाऊल टाकले. प्रवेशद्वारातून आत गेल्यागेल्या रामकृष्ण परमहंस साधनेत असतांनाची प्रतिमा बघितली. त्यांत मध्यभागी ओंकार, क्रूस व चांदतारा होता. (विळा-कोयताही असता तर फार बरे वाटले असते.) हे बघून डोळे दिपले. ज्या प्रतिभाशाली हिंदू धर्माचा प्रसार करण्यास विवेकानंद जगभर फिरले, त्यांच्याच गुरूंच्या नावे असणार्या मठात हे सगळे बघून आश्चर्यच वाटले. तेथील अथांग शांतता अनुभवून मन प्रफुल्लित झाले. त्या वास्तूच्या आवारात असणार्या तरुणांच्या वावराने युवा दिन हाच का, ह्याच प्रश्नांची काही प्रमाणात उत्तरे सापडू लागली. ह्या ठिकाणच्या युवाशक्ती तीव्रता अधिक लक्षात येऊ लागली ती जवळपास आपल्याच वयाचे, उच्च विद्याविभूषित, सडेतोड इंग्लिश झाडणारे मोंक्स् (साधू) बघून. कायम चेहर्यावर स्मितहास्य ठेवत आपल्या प्रश्नांची उत्तरे वेषधारी लोक लक्ष वेधून घेत होते.
कालांतराने चंद्रकांत खोत ह्यांचे ‘बिंब-प्रतिबिंब’ हे विवेकानंद व रामकृष्ण परमहंस यांच्यातील गुरू-शिष्य संबंधातील रहस्य उलगडणारे पुस्तक वाचनात आले. गुरूची परीक्षा घेणारा नरेंद्र, झाडावर उलटे टांगून घेऊन बागुलबुवाची भीती दूर करणारा बेधडक पोरगा, टेनिसने सांगितलेली ‘Excursion’ नावाची कविता ऐकून ‘समाधी’ म्हणजे काय? हे जाणून घेण्यासाठी रामकृष्णांच्या आश्रमात जाणारा नरेंद्र, शरीराने कमकुवत असणार्या आपल्या भावंडांच्या तोंडात मांसाचा घास भरवणारा नरेंद्र, बेरोजगारीने त्रस्त नरेंद्र, गाढवातले आणि माणसातले चैतन्य कसे एकच, म्हणत टिंगळटवाळी करणारा नरेंद्र, नंतर समुद्रातील एका निर्जन शिलेवर राष्ट्रचिंतन करणारे स्वामीजी, हे सगळच अगदी अद्भुत. एका सामान्य युवकाप्रमाणे जगलेला, त्यानंतर विवेकानंद नाव धारण करणारा नरेंद्र, नाहीतर दुसरे कोण आदर्श-श्रेष्ठ युवक ठरणार. महात्मा गांधींनी म्हटल्याप्रमाणे माझे जीवनच माझा संदेश. याप्रमाणे केल्यास स्वामीजींनी युवकांसाठी अजून दुसरे काही करण्याची गरजच काय? त्यांचे जीवन हाच युवकांसाठी संदेश आहे.
त्यानंतर रामकृष्ण मठात असणार्या ग्रंथालयातील स्वामीजींवरील शेकडो पुस्तके वाचून संपवली. त्यातली एक अफलातून कलाकृती म्हणजे ‘विवेकानंद आणि मार्क्स’ हे पी. परमेश्वरन् यांचे पुस्तक. परमेश्वरन् हे मुळात कडव्या डाव्या विचारांचे (मार्क्सवादी). एका मार्क्सवाद्याला एका योग्याने-साधुपुरुषाने मोहून टाकणे म्हणजे आश्चर्य तर आहेच पण अद्भुत (Miraculous) सुद्धा! परमेश्वरन् यांनी विवेकानंदांचे तत्त्वज्ञान इतक्या सहजतेने सांगितले आहे की खुद्द रामकृष्ण मिशनने प्रकाशित केलेल्या पुस्तकातून कळायलाही अवघड वाटावे. विवेकानंदांचे अध्यात्म कसे विज्ञाननिष्ठ होते हे जाणून घेण्यास हे पुस्तक वाचायलाच हवे.
असे बहुआयामी विज्ञाननिष्ठ-विवेकवादी-बुद्धिवादी-आध्यात्मिक धार्मिक विवेकानंद, व त्यांचे विचार देशकालबाह्य कधीही होऊ शकत नाहीत. ते कालातीत आहेत. कालातीतच राहतील. सदैव तरुण राहतील. म्हणून हा युवा दिन.
(शेवटाला-स्वामी म्हणाले होते- ‘‘पूर्व आणि पश्चिम यांनी आपापली वैशिष्ट्ये नष्ट न करता एकमेकांच्या हातात हात घालून एकमेकांंच्या हितासाठी कार्य करायला हवे.’’ हे कालच्या विज्ञानपरिषदेत बोलणार्या लोकांस कळले असते तर अशी बेताल वक्तव्ये झाली नसती. असो.)
युवा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
दादा, खूप छान.
ReplyDelete