Friday, April 17, 2015

सुमंत सर कालवश


पुणे विद्यापीठातील राज्यशास्त्राचे प्राध्यापक हीच फक्त सुमंत सरांची ओळख नव्हती तर सरांचे मार्गदर्शन हे त्याही पलिकडचे होते. राजकीय विश्‍लेषक म्हणूनही सर जरी प्रसिद्ध असले तरी प्रत्येक राजकीय घटनेला-बाबीला कायमच तथाकथित गल्लाभरू राज्यशास्त्रीय नियम-सूत्रे व समिकरणे लावण्याचा पायंडा मोडीत काढत, सुमंत सर आंतरविद्याशाखिय दृष्टिकोनातून घटनेची मीमांसा करीत असत. सरांनी काही वेळा इतरांच्या आग्रहाखातर नाट्यपरीक्षणापासून चित्रपट समीक्षणही प्रायोगिकरीत्या करण्याचा प्रयत्न केला. ह्या सगळ्यातूनही सरांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा विद्यार्थ्यांशी असणारा सलोखा व दांडगा संपर्क. सरांनी एखादा मुद्दा पटवल्यावर तो त्या विद्यार्थ्याला समजला नसावा. असा एकही विद्यार्थी सापडणे कठीण होते. सुमंतसर फक्त विद्यापीठातल्याच विद्यार्थ्यांमध्ये प्रसिद्ध नव्हते. तर ते बाहेरील कला शाखेत शिक्षण घेणार्‍या मुला-मुलींपासून थेट आमच्यासारख्या अभियांत्रीकीय शिक्षण घेणार्‍यांपर्यंत प्रसिद्ध होते.

सुमंत सरांकडे आपले प्रश्‍न घेऊन जाणारा विद्यार्थी कधीही निराश होऊन परतत नसे. मग ते प्रश्‍न राज्यशास्त्रविषयक असो किंवा अगदी वैयक्तिक जीवनातीलही. अवघड बाब सोप्या भाषेत कशी मांडावी हे सरांकडून शिकायला मिळाले. सरांना अधिक चिंता असायची ती राजकीय पटलावर होणार्‍या पुरोगामित्व व संस्कृतीची अनपेक्षित सरमिसळीची. तसेच जात, धर्म ही शोषणाची दमणकारी व्यवस्था आहे. व ती बदलण्यासाठी अजूनही ही सामाजिक परिवर्तनाच्या चळवळींनी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे असे त्यांचे परखड मत होते. डाव्यांना सुमंत सर डावे वाटत असत तर उजव्यांना उजवे.

‘कार्यकर्ते म्हणजे अनुभवाचे जिवंत भांडार असते. वाचनासोबत प्रत्यक्ष अनुभवांची साथ असल्याने हे सगळे शब्दबद्ध झाल्यास अनुभवांचे शास्त्र होईल. ह्या शास्त्राचे रूपांतर परिवर्तनाच्या हत्यारात होईल. त्यामुळे सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांनी लेखन सुरुच ठेवले पाहिजे’ असे त्यांचे मत होते.

सुमंत सरांच्या ज्ञानजिज्ञासाची आस सर्वश्रुत होती. त्यांना वाचनाची अफाट सवय होती हे वेगळं सांगायला नको. सरांकडून अगदीच दुर्मिळ आणि वेगवेगळ्या पुस्तकांची माहिती मिळे. ती पुस्तके जमवून वाचणे हा छंदच जडला होता. त्यातून ज्ञानात भर पडत असेच पण ‘Enlightened’ व्हायला होई. सुमंत सरांची वैचारिक जडणघडण ही डाव्याविचारसरणींनी प्रभावित होऊन झाली. मूळचे धुळ्याचे असणारे कॉ. शरद पाटील यांच्या तालमीत सर काही काळ होते. व पाटील यांच्या अनेक चळवळींतही त्यांनी सहभाग घेतला होता. कालांतराने सर गांधीविचारसरणीकडे वळले. महाराष्ट्रात गांधीवादाची फेरमांडणी त्यांनी केली. डॉ. आंबेडकरांचेही विचार त्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात पाठविले. राज्यशास्त्राचे प्राध्यापक असल्याने त्यांनी आंबेडकरांभोवतीची दलित चौकट फोडण्याचा प्रयत्न केला व त्यापलिकडेही असलेली बाबासाहेबांची विद्वत्ता त्यांनी लोकांपर्यत पोहचवली. आंबेडकर सर्वांसाठी होते, आहेत, व राहतील हे ते आवर्जून सांगत.
गांधी, टिळक, आगरकर व आंबेडकरांपासून सरांवर अल्बर्ट कामूस, एरिक हॉब्सवॅम, मार्क्स, रॉल्स, रूसो, अगदी मकायव्हॅलीपर्यंत सगळ्यांचा प्रभाव होता. सर हे लोकशाहीचेही कट्टर समर्थक होते. अ‍ॅरिस्टोटल-प्लेटो-सॉक्रेटस हा त्यांचा अगदी जिव्हाळ्याचा विषय.
अशा प्रकारे सरांनी अनेकांना विवेकवादाचेही धडे दिले. आपल्यातला ‘Rationale’ मरू देऊ नका असे ते कायम म्हणत. नेमक्या शब्दांत म्हणणे मांडणेही सरांनीच शिकवले.
अशा Friend-Philosopher, Teacher असणार्‍या यशवंत सुमंत सरांना भावपूर्ण श्रद्धांजली!

No comments:

Post a Comment