खरे तर वरील मथळ्यात अभिव्यक्तीच्या जागी नैतिकता, सहिष्णुता, सहनशीलता अशी शब्दे हवी होती-कारण तीही मेलीच आहेत. म्हणावे लागेल. पेरूमल मुरूगन यांच्या सोबतचं...
जशी कुठल्या एखाद्या मुहूर्तावर पोथ्यांची पारायणे होत असतात, तशीच प्रजासत्ताकदिनी संविधानाची का होत नाही? असे झाले असते तर निदान आज एका जिवंत लेखकाला स्वत:च मेल्याचे घोषित करण्याची वेळ आली नसती. ह्याला काही पत्रकार ‘आत्महत्या’ असल्याचेही बोलले - पण हा तर खून आहे. फक्त लेखकाचाच नव्हे तर अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा... मग राज्यघटनेचाही येतोच.
गुन्हा काय ह्या ‘पेरूमल’ नावाच्या, शासकीय महाविद्यालयात काम करणार्या प्राध्यापकाचा? तर भूतकाळातील काही अनिष्ट रूढी-परंपरांना (खरे तर अंधश्रद्धाच) लिखाणावाटे वाचा फोडली. हा गुन्हा. पॅरिसमध्ये दहा व्यंगचित्रकारांची हत्या झाली म्हणून हल्ल्याच्या निषेधार्थ लाखो लोकं रस्त्यावर आली आणि व्यंगचित्रे काढणेही थांबले नाहीच. मात्र सहिष्णुतेचे (काही अंशी आधुनिकेतेचेही) प्रतिक समजल्या जाणार्या भारत देशात लोकांनी एकत्र जमून लेखकाची अभिव्यक्ती जपण्यासाठी लढण्यापेक्षा, त्याची गळचेपी करायला निघाले. यात फक्त कुठला एक वर्ग, जात, धर्म किंवा पंथच नव्हता तर... अजव्या-डाव्यांसकट, पुरोगामी म्हणविणारे जातिभेदाच्या भिंती फोडू पाहणारेही पुढे होतेच.
पेरूमल मुरूगन हे कोंगुनाडूमधील (तामिळनाडू राज्यातील) राहणारे. शांत व संयमी स्वभावाचे इसम. मुख्यत: त्यांच्या लिखाणात भोवतालच्या परिस्थितीचे व भूतकाळातील घटनांद्वारे प्रभावित होणार्या समकालीन समाजाचे वर्णन आढळते. ज्या पुस्तकावरून हा वाद निर्माण झाला त्या ‘माधोरूबागन’ नावाच्या पुस्तकात. ‘कोंगू वेल्लाला गाऊंडर’ ह्या जातीतील अपत्य होत नसलेल्या ‘पोन्ना’ नावाच्या अभागी स्त्रीची व तिच्या नवर्याची कथा आहे. ‘माधोरूबागन’चा अर्थ अर्धनारीश्वर. भगवान शंकराचे रूप. कोंगुनाडूमधील नमक्कल नावाच्या गावातील गाऊंडर लोकांचे कुलदैवत. तर तेथील काही वर्षांपूर्वीची प्रथा अशी की यात्रेवेळी अपत्य होत नसलेल्या गृहिणीने यात्रेतील आवडेल त्या पुरुषाशी संग करणे. तेही सर्वसंमतीनुसार. मग त्यातून मिळालेल्या अपत्यास ‘सामी पिल्लई’ म्हणजेच देवाचे मूल म्हणून आनंद साजरा करणे.
हा तर फक्त वाद निर्माण करणारा भाग. किंवा काही समाजकरंटकांनी पुस्तकाचा सांगितलेला स्वयंघोषित ‘क्लायमॅक्स’. मात्र कथा एवढीच नाही. कथेतील स्त्री पोन्ना व तिचा पती काली एकदुसर्यांवर प्रचंड प्रेम करत असतात. नि:संतान असल्याने पोन्नाला सारखे हिणवले जाते. शेवटी कालीला त्याचे आई-वडील दुसरे लग्न करण्याचे सुचवतात. हा निर्णय पोन्नालाही मान्य असतो. कारण तिचे काली सोबत राहणे हेच खूप समजून नशिबावर सोडते. परंतु दोघांचेही प्रेम न विरणारे असल्याने दुसर्या लग्नाचा प्रस्ताव मागे पडतो. पण कालीच्या आईला शांत बसवत नाही. ती पोन्नाला नमक्कलच्या यात्रेत पाठविण्याची योजना बनवते. कालीची याला संमती मिळत नाही. मग गुप्तपणे योजना करण्याचे कालीची आई ठरवते. मात्र तीही यशस्वी होत नाही. शेवटी कालीचाच पतिव्रता पोन्नावरील विश्वास उडतो व कथानक संपतं. आता ह्या सगळ्यात भावना दुखावण्यासारखे काय? हा प्रश्न पडणे साहजिकच.
पण आपल्या धार्मिक भावनांसंदर्भात आपण किती उथळ व स्फोटक असावे हे घडलेल्या घटनेवरूनच ठरते. हे जो तो आपआपलंच ठरवत असतो. मात्र ह्या सगळ्याने मूळ भारतीय लोकशाहीचा प्राण असणार्या राज्यघटनेच्या गळ्यालाच नख लागत असेल तर आपण आपल्या धोरणांबद्दल पूर्णविचार करायलाच हवा.
राज्यघटनेला नख लागले म्हणजे नक्की काय झाले? तर काही सनातनी कडव्या संघटनांनी प्रशासनाला व पोलिसांना मेरुगन यांच्याविरुद्ध कारवाई करू देण्याची मागणी केली. तसेच लिखित स्वरूपात माफीनामाही मागितला. तेव्हा आपल्या एरवी सुस्तावलेले असणार्या जाड कातड्याच्या प्रशासनानेही मुरुगन यांच्याकरवी माफीनाम्यावर सक्तीने स्वाक्षरी करवून घेतली. ज्याने नैराश्येत गेलेल्या मुरुगन यांना फेसबुकवरून आपल्यातला लेखक मेल्याची घोषणा करावी लागली.
माझी सगळी ग्रंथसंपदा जाळून टाका असे म्हणतांना मुरुगन यांच्या स्थितीचे आकलन करणेच अवघड. ‘लेखक म्हणून आपला मृत्यू झाला आहे. यापुढे, जिवंत असेल तो फक्त अध्यापक पेरूमल विके्रत्यांनी पुस्तके परत पाठवावीत व वाचकांनी जाळून टाकावीत’ अशी विषण्ण प्रतिक्रिया पेरुमल यांनी नोंदवली.
आणि गंमत म्हणजे ज्या गाऊंडर समाजाने पेरुमल यांविरूद्ध मोर्चे काढले, त्याच समाजातील पेरूमलही. अजून योगायोग असा की कट्टर हिंदूविरोधी, मूर्तिपूजा न मानणारे पुरोगामी विचारांचे म्हणवले जाणारे पेरियार रामास्वामी नायकर मूळ ह्याच भूमितले. समाजसुधारणेची दवंडी पिटणारे व नायकरांना गुरूस्थानी मानणारेही मोर्चेत होतेच. हा प्रचंड विरोधाभास. द्रविडी चळवळीतून घडलोय म्हणणारे पक्षही चिडीचूपच. एरवी कलम 19 (1) (ए) साठी झगडणारं व त्यासाठी सर्वाधिक जनहितयाचिका मांडणारे, ह्याच भूमितील वीरही शांत बसलेत.
अभिव्यक्तीला आज खांदाही न देता, पायानेच तुडवत स्मशानात नेले जात असतांनाही शांत असणे व प्रजासत्ताकदिनाच्या मुहूर्तावर एक लेखक जिवंतपणीच मरणे ही आजची शोकांतिका.