Curtsey: www.swatantranagrik.in
‘अतिपरिचयात अवज्ञा’ ही मराठी म्हण प्रदेशसापेक्ष आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय आणि ते केलंय ‘चाणक्य मंडल परिवारा’तर्फे झालेल्या ‘काश्मीर अभ्यासदौर्याने’. ह्या लेखाचा मथळा ठरविताना बराच गोंधळ उडाला, कारण डोक्यात एवढं काय काय होतं की काही सुचेचना! ‘काश्मिरी पीपल: इंडियन सिंपथायझर ऑफ अफझल गुरू’ आणि ‘काश्मिरी लोक – पाक क्रिकेट संघाचे भारतीय प्रेमी’ अशी काही नावं डोक्यात येरझरा घालत होती. कारण जे काही पूर्वग्रह घेऊन आम्ही काश्मीरला गेलेलो त्यापेक्षा खूपच वेगळं होतं आम्ही अनुभवलेलं काश्मी आणि जम्मूही.
जम्मू आणि काश्मीरमध्ये तेथील स्थानिक लोक ‘कश्मीरियत’ नावाची संकल्पना नजरेसमोर ठेवून जगतात जी बंधुभाव, लवचीकपणा, स्वदेशाभिमान यांचा धर्मापलिकडे जाऊन पुरस्कार करते. ज्या ‘कश्मीरियत’ संकल्पनेवर हिंदू शैववाद, बुद्धवाद व सूफी परंपरेचा प्रभाव आहे, ह्या अशा अर्वाचीन संकल्पनेवर संपूर्ण ‘वादी-ए-कश्मीर’ व तिचे लोक बांधले गेले आहेत. म्हणूनच तेथील एका फुटिरतावादी संघटनेचा नेता यासीन मलिक म्हणतो, ‘‘आम्हाला वेगळं राष्ट्र हवे आहे कारण आम्ही काश्मिरी आहोत. भारतीय ही संकल्पना काय आहे?’’ आमच्यातील एकाने जेव्हा जाता जाता मलिकला प्रश्न विचारला, ‘‘तुमच्या स्वप्नातलं स्वतंत्र जम्मू-काश्मीर कसे असेल? धर्म/ईश्वरसत्ताक राज्यपद्धतीवर आधारित असेल की धर्मनिरपेक्ष लोकशाही?’’ तेव्हा तो उत्तरतो, ‘‘धर्मनिरपेक्ष लोकशाही.’’ आणि एवढच उत्तरुन निघून जातो.
यावरून एक नक्की सिद्ध होतं की स्वतंत्र जम्मू-काश्मीरच्या मागणीला ‘‘कश्मिरियत’’ हा एक मुद्दा कारणीभूत असू शकतो.
आता स्वतंत्र जम्मू-काश्मीरच्या मागणीला अनेक मुद्दे कारणीभूत आहेतच जे सगळ्यांनाच माहीत असावेत किंवा नसतील तरी कुठेही वाचून मिळतीलच. प्रश्न आहे सामान्य जनतेचा, त्यांच्या मतानुसार नक्की कुठले असे घटक असावेत की मागणी वारंवार उफाळून वर येते, त्या लोकांच्या स्वतंत्र काश्मीरमागील भूमिका काय असावी, याचा ऊहापोह करायला दौर्याच्या मांडणीनुसारच गेलेले बरे.
आमचा पहिल्या रात्रीचा डोडामधील मुक्काम संपवून आम्ही भद्रवाहला गेलो. भद्रवाहमध्ये प्रवेश करताच तुम्हाला एक बाजार लागतो, जो भद्रवाहमधील महत्त्वाचा भाग आहे. ‘सेरी बाजार’ म्हणून ओळखल्या जाणार्या ह्या भागात निरीक्षण केल्यास एक बाब तुमच्या लक्षात येईल की तेथील जवळपास ९५% दुकानांच्या पाट्या हिंदू-नामदर्शक आहेत ज्यावर ओम व स्वस्तिक रखाटले आहे. तेव्हा तेथील एका पहारेकरी RPFच्या सैनिकाला विचारले असता तो सांगतो, ‘‘साबजी, यहॉं हिंदुओंका वर्चस्व जादा है. यहॉंके मुसलमान को अगर दुकान चलाना हो तो उसे हिंदू-नामिक बोर्ड के नीचेही चलानी पडती है.’’ हे ऐकून आम्ही थक्क झालो. याउलट किश्तवाडमधील परिस्थिती वेगळी होती. तेथे प्रवेश केल्या – केल्या तुम्हाला जाणवेल की तिथे मुस्लीम वर्चस्व जास्त असावं. किश्तवाडमध्ये जवळपास ५ किमी आत जाईपर्यंत तुम्हाला एकही हिंदू घर दिसणार नाही. ५ किमी पुढे गेल्यास एकही मुस्लिम घर दिसणार नाही.
मात्र किश्तवाडमधील एक सुप्रसिद्ध चहाचा ठेला व त्या ठेल्याच्या सुप्रसिद्ध मालकीण ‘गुड्डी आंटी’ ज्या NCच्या नेत्या सुद्धा आहेत. म्हणतात ‘‘यहॉंपे पूरे किश्तवाड में भाईचारा है|’’
याउलट तेथील बीजेपी नेता सुनील शर्मा अगदी विरुद्ध चित्र निर्माण करतात. जेव्हा त्यांना आम्ही सांगतो की येथील काही लोकांच्या म्हणण्यानुसार इथे बंधुभाव आहे तेव्हा शर्मा जाणीवपूर्वक गुड्डी आंटीच्या वक्तव्याचे खंडण करतात. तरीही शर्मा दोलायमान होऊन सांगतात की पहिली किलिंग ही मुसलमानांकडूनच झाली. संतोष थापर आणि संतोष भंडारी यांच्या स्वरूपात हत्या होऊन त्यानंतर डोडा व किश्तवाडमधील शांतता भंग झाली. पण आमची लढाई ही कुठल्या जाती-पंथ-धर्मातील लोकांविरुद्ध नाही तर ती आहे Nationalistविरुद्ध Anti-nationalistयांची.
कितीही नि:पक्षपातीपणे शर्मांच्या वक्तव्यांकडे बघण्याचा प्रयत्न केला तरी त्यांची वक्तव्ये डावलून चालणार नाही कारण इंडियन आर्मीने स्वत: स्पेशल पोलीस ऑफिसर (SPO) म्हणून शर्मांची निवड केली त्यांच्यावर जरी ९ ऑगस्ट २०१३ रोजी झालेल्या दंगलींचे आरोप असले तरी त्यांची बाजू झुकली नाही. ते दंगलीविषयी सांगतात, ‘‘९ ऑगस्ट रोजी ३००० मुस्लिमांचा जुलूस चालू असता, तेथे शर्मांचा अंगरक्षक सितारसिंग येतो. तो औषधे घेण्यासाठी मार्केटमध्ये गेलेला असता मेडिकल शेजारी गाडी लावतो. तेवढ्यात जुलूसातील एक व्यक्ती सितारसिंगवर धक्का लागल्याचा आरोप करून त्याला मारहाण करते व भडका उडतो…’’ हे वक्तव्य प्रमाण जरी मानले नाही तरीही १००% खोटे ठरवता येत नाही. वर्तमानपत्रांमधून तर आम्हाला असे कळले की सुरवात हिंदूपासून झालेली व चूकही हिंदूंचीच होती पण तेही १००% खरे नाही हे तिथे गेल्यावर कळले खरं तर चूक कुणाची ह्याचा शोध घेणे निव्वळ मूर्खपणा! तेथील लोकांना हे हत्याकांड नको आहे. तेथील खरं तर, ना हिंदू ना मुस्लिमांना दंगली हव्यात तेथील ९३% लोक सुशिक्षित आहेत. त्यांना ना नोकरी आहे ना त्यासाठीची संधी. रिकामं घर सैतानाचं असंच काहीतरी आहे. हाच राग ह्या दंगलीमार्फत जगासमोर येतो मात्र नाव दोन्ही समाजघटकांचं खराब होतं, ह्याचा फायदा संधीसाधू राजकारणी लोक घेतात. किश्तवाड, भद्रवाहमध्ये प्रेम मात्र खूप मिळालं. गुड्डी आँटी व सुनील शर्मा दोघांनीही अतोनात मदत केली. अक्षरश: किश्तवाडमधील लोकांनी जीव ओवाळून टाकलेला. जितकं किश्तवाड सुंदर तितकंच तेथील लोकांचे हृदयही.
किश्तवाडमध्ये एक नगरसेवक भेटले त्यांच्या म्हणण्यानुसार ‘‘१५ ऑगस्टला भारताचा झेंडा फडकवण्याऐवजी इथे १४ ऑगस्टला पाकिस्तानी झेंडा फडकतो. इथे ‘‘भारत माता की जय’’ ही जातीय घोषणा मानली जाते.’’ शेवटी ते खंत व्यक्त करतात की, काही वर्षांनी ‘‘भारत माता की जय म्हणायला माणसे भाड्याने आणावी लागतील.’’ हे ऐकताना हृद्यात चिर्रर्र झालं. डोकं बधीर झालं आणि काही वेळ आम्ही षंढासारखिच उभे राहिलो. परंतु ह्या सर्वांवर एकच उपाय सांगताना ते म्हटले, ‘‘Governmentको बस इतना बोलो की यहॉं का Anti-India cultureनष्ट कर दो. बाकी हम संभाल लेंगे|’’
‘‘देखिए ना आपकी सरकार हमपे कितना जुलूम करती है| अफजल गुरू ‘साब’ को भी फॉंसी पे लटका दिया| हम नही बोलते की उन्हे सजा ना दो| अगर है गलती तो सजा मिलनी चाहिए| लेकीन उन्हे फॉंसीपे लटकाने का तरीका गलत था|’’ असं आमचा बिजबिहारामधील यजमान (आशिक रादर) आम्हाला सांगतो, ‘‘अफझल गुरु साब तो एक शरीफ, पढ़े-लिखे आदमी थे| उन्हे युनिर्व्हसिटीसे उठा ले आए, और सिदा कठहरेमे खडा कर दिया|’’ अशी द्विधा अवस्थेतील वक्तव्य केल्याने आमचा ताबा सुटला. काही वेळ बौद्धिक क्षमतेची कसोटी लावून आम्ही आमचा Defenceचालू ठेवला. त्याला आमचे मुद्दे पटवण्याचा प्रयत्न केला, पण काही केल्या त्याच्या हृदयातील असंतोषाचा धगधगता अग्नी थंड होत नव्हता. शेवटी भाऊक होऊन त्याने AFSPAमुळे भारतीय लष्कराकडून होणार्या त्रासाची कहाणी सांगायला सुरुवात केली. तो म्हणाला, ‘‘हे बघा, अगदीच स्पष्ट बोलतो, आम्हाला भारतीय लष्करामुळे अतोनात हाल सोसावे लागलेत. खरं तर प्रत्यक्ष लष्कराकडून त्रास झालेला नाही. झाला तो फक्त आणि फक्त लष्कराने तयार केलेल्या ‘RR’तुकडीचा. RRम्हणजे ‘राष्ट्रीय रायफल्स.’ही तुकडी खास घुसखोर आतंकवाद्यांचा बंदोबस्त करण्यासाठी झालेला. त्या तुकडीत ‘वादी-ए-काश्मिर’ मधीलच दर्या-खोर्यातील अशिक्षित लोकांना गोळा केले गेले. त्यांना रोज रात्री दारू पाजली जाई. रात्रीच्या ११ नंतर त्यांना गावात सोडले जाई. असे गाव जेथे आतंकवाद्यांचे तळ आहेत. सुरुवातीला खरोखर आतंकवादीच मारले जात. पण कालांतराने जशी आतंकवादी मिळणे कठीण झाले; ह्याच अशिक्षित जनावरांनी AFSPAच्या नावाखाली निर्दोष लोकांना पकडणे सुरू केले. जाळपोळ सुरू केली. बायकांची घरात घुसून अब्रु लुटली… अनागोंदी माजली… व सर्व Armyबदनाम झाली.’’
ह्या ‘RR’ तुकडी विषयीच्या
तसेच ‘स्पेशल टास्क फोर्स.’ यांच्याकडून झालेल्या जुलुमांविषयाीच्या अरोपांना एका केंद्रीय पोलिस अधिकार्याचाही दुजोरा मिळतो. त्याची सत्या-सत्यता तपासणे तसे कठीण असले तरी एकंदरीत थोडे तरी तथ्य नक्कीच असावे. थोडक्यात काय तर हाही काश्मीरमधील ‘सलवा जुडूम’चाच प्रकार.
त्यानंतर आम्ही तेथील प्रशासन व्यवस्था जाणून घेण्यासाठी ‘अनंतनाग म्युनिसिपल कौन्सिल’ ला भेट दिली. गेल्या दोन वर्षांपासून येथील म्युनिसिपल कौन्सिलमध्ये संपूर्णपणे e-Governanceचा अवलंब केलेला दिसतो. ९ तासांच्या आत तुम्हाला हवी ती आवश्यक कागदपत्रे मिळतात. ही नक्कीच स्वागतार्ह बाब बसली तरी मूळ शोकांतिका ही की कौन्सिलची निवडणूक प्रक्रिया गेली ९ वर्षे झालेलीच नाही त्यामुळे कामांत बराच ढिसाळपणा वाढला आहे. तेथे आधार कार्डच्या प्रक्रियेत काहीही प्रगती नाही. कौन्सिलचे बरेचसे इन्कम हे लोक बस सर्व्हिस टॅक्स व हातगाडीवाल्यांकडून मिळणारे टॅक्स यावर अवलंबून आहे. अजून एक बाब सुखकारक आहे ती म्हणजे येथे ‘इंदिरा आवास योजनेचा’ भरपूर प्रमाणात उपयोग करून घेतला गेला.
काश्मिर सेंट्रल युनिव्हर्सिटीचे मॅनेजमेंट स्टडीज विभागाचे प्रमुख अब्दुल गनी व त्यांचे सहकारी फारुक यांच्या निप:क्षपाती चौफेर फटकेबाजीने मन मोहून टाकले. जवळपास AFSPAपासून मॅनेजमेंट ते उद्योगक्षमता अशा सर्व घटकांवर सर्वंकश चर्चा अब्दुल गनी व श्री फारुक यांनी केली. उद्योग व व्यापारविषयी बोलत असतांना वीजनिर्मितीवर वक्तव्य करतांना फारुक म्हणतात, ‘‘काश्मीरमधील जवळपास सर्वत्र नद्या दुथडी भरून वाहतात. विशेष म्हणजे उंचावरनं उतरत असल्यामुळे ह्या नद्यांकडून प्रचंड प्रमाणात वीजनिर्मिती होऊ शकते. पण मध्ये कलम ३७० चाही अडथळा येतो. मात्र ह्या समस्येवर जम्मू-काश्मीर सरकार नक्कीच मात करू शकते. पण इच्छाशक्ती हवी. आजही अनेक वीजनिर्मिती प्रकल्प जम्मू-काश्मीरमध्ये आहेत. खंत ही की सगळी निर्मित वीज उत्तरेकडे (म्हणजेच दिल्ली-पंजाब-हिमाचल प्रदेश) कडे वळवली जाते आणि इथे आम्हाला ६ तास लोकशेडिंगमध्ये दिवस काढावे लागतात.’’
अब्दुल गनी म्हणतात, ‘‘बाहेरून इथे उद्योगधंदे आयात करण्याची खरं-तर गरजच नाही. काश्मिर मध्येच एवढे नव-नवीन अणि निर्यात करण्यालायक उद्योग आहेत आणि तेवढेच Entrepreneurकी article 370रडत बसणं योग्य नाही. आम्ही आमचे विद्यार्थी दरवर्षी इतर राज्यांत इंटर्नर्षीप करण्यास पाठवतो. ज्यायोगे येथील होतकरू मुलांना एकंदरीत बाहेरील बाजाराची कल्पना यावी व आपण सगळे एक आहोत ही जाणीव वाढीस लागावी.’’
येथील (काश्मिरमधील) परिस्थितीचा फायदा हिमाचलमधील पर्यटन क्षेत्रातील व तेथील बाजारी लोक घेण्याचा प्रयत्न करतात. मागे घडलेली एक घटना सांगतो. वादी-ए-कश्मीरमध्ये ५ वर्षांपूर्वी ५ साखळी बॉम्बस्फोट घडवण्यात आले आणि तेही ऐन पर्यटनास अनुकूल असणार्या काळाच्या तोंडावर त्याने जवळपास ४०,००० पर्यटकांनी आपली Reservationsरद्द केली व त्यातील ४०% लोकांनी हिमाचलात, (शिमला, मनाली)ला जाणे पसंत केले. नंतर हे उघड झाले की हे सगळं कारस्थान हिमाचलातील पर्यटन उद्योगक्षेत्राशी निगडित असणार्या काही लोकांचे होते. हे सांगताना जेव्हा अब्दुल गनी भावुक झाले तसाच आमचा थरकाप उडाला. आम्हाला झटकाच बसला. याअर्थी एक कळून चुकले काश्मीरची पिळवणूक दोन्हीही बाजूंनी होते आहे. ना घर का ना घाट का!
श्रीनगरमध्ये आम्ही एका अफाट माणसाला भेटलो जो माणूस काश्मिरीही होता. U. P.वाला पण आणि अस्खलित सदाशिव पेठी मराठी बोलणाराही, अगदीच cajualजरी एक मोठे पोलिस अधिकारी असले तरी कुणालाही आपलेसे वाटेल असे व्यक्तिमत्व. ती व्यक्ती म्हणजे आयपीएस शैलेन्द्र मिश्रा, पोलीस अधीक्षक पांथाचौक. श्री. मिश्रा जवळपास १.३० तास बोलत राहिलेे. त्यांनी थांबूच नये असंच वाटावं असं वक्तृत्व. त्यांनी ज्याप्रमाणे काश्मीरच्या इतिहासापासून काश्मीर समस्येची मांडणी आम्हासमोर केली, एखाद्या देशभक्त, कार्यकर्ता अधिकार्याला शोभावी तशीच अगदी.
शैलेन्द्र मिश्रांनी सगळी काश्मिरमधील व त्याविरुद्ध राज्य पोलिसांनी दिलेल्या लढ्याची पार्श्वभूमी सांगताना १९९१ च्या आर्थिक सुधारणांमुळे दहशतवादी प्रवृत्ती व काश्मिर परिस्थितीवर झालेल्या बदलाविषयीही सांगितले. त्यांच्या मते १९९१ च्या आर्थिक सुधारणांचे पडसाद काश्मीरवरही खूप खोलवर पडले व त्याने लोकांची मानसिक स्थिती बदलली व तेथील तरुणांनाही आशेचा किरण दिसला. त्यानंतर बरेचसे गैरमार्गाला गेलेले तरुण शरणही आले. मिश्रांनी अगदी थोडक्या वेळात ‘Rainbow Revolutions’ पासून ते श्री. अमरनाथ संघर्ष समिती, जगनमोहन यांचे स्थान, तसेच शेख अब्दुल्लांपासून ते मोदी फॅक्टरपर्यंत सगळं सुटसुटीतपणे सांगितले. त्यांच्या मते जम्मू काश्मीरमधील सर्व अधिकार्यांनी आपल्या गाडीवरील लाल दिवा काढावा जेणे करून काश्मिरी लोकांचे सहकार्य मोठ्या प्रमाणात मिळेल. त्यांच्या स्वत:च्याही गाडीवरील दिवा त्यांनी काढला. त्यांच्या मते काश्मिरी लोक धर्माने मुस्लिम असले तरीही त्यांची संस्कृती हिंदूंशी साम्य असणारी आहे आणि स्वभाव बौद्धांप्रमाणे God-lovingव मनमिळाऊ आहे.
त्यांच्या दुसर्या दिवशी मिश्रांनी ११:३० मिनटांनी यासीन मलिक सोबत भेट निश्चित केली. जेव्हा मलिक आम्ही बसलेल्या खोलीत शिरला तेव्हा ५ मि. भयंकर शांतता पसरली. कुणीही काहीही बोलले नाही. शेवटी त्यानेच सुरुवात केली मौलाना शौकत अहमद शहाच्या नावाने. त्याचे त्यानंतरचे वाक्य होते, ‘‘I would not like to influence my countrymen in Kashmir on false promises and I will try to never gonna happen this.’’ त्याच्या मते जम्मू-काश्मीरमधील सर्वच पक्षांना केंद्रीय गृहमंत्रायलाकडून निधी पुरविला जातो. एवढे गुन्हे करूनही त्याचे हास्यास्पद वाक्य म्हणजे, ‘‘I have gone through transition from violence to Gandhian philosophy.’’ म्हणजेच ‘‘सो चूहे खाकर बिल्ली चली हज को|’’
मलिकने गांधीवादामागील त्याची भूमिका स्पष्ट करतांना त्याचा ६ कलमी विचारांवर आधारित असलेला कार्यक्रम सांगितला.
१) कुणावरही आमची श्रद्धा थोपवली जाणार नाही.
२) बुद्धवादी विचारांमधील परिवर्तन
३) काश्मीर-शंकराचार्य नाते व हिंदूबांधव
४) ५००० वर्ष जुना अहिंसक इतिहास
५) अहिंसक लोकशाही चळवळ
६) शांतताप्रेमी अहिंसक चळवळीने लढा.
त्याचप्रमाणे त्याचे आदर्शही बदललेत. मार्टिन ल्यूथर किंग, नेल्सन मंडेला आणि गांधी. हे सगळं हास्यास्पद जरी असले तरी आपण आशावादीच असलेले बरे. एक मात्र उघड उघड आहे यासिन मलिकची महत्त्वाकांक्षा वाढली आहे. तो काश्मीरचा गांधी किंवा फार फार तर जीना व्हायला बघतो आहे. देव त्याचेही भले करो!
ह्या सगळ्यातून एक गोष्ट मात्र स्पष्ट होते. हा काळ बदलाचा आहे. संधीचा आहे. इतिहासात केलेल्या चुकांची पुनरावृत्ती करणे आता माफ नाही. योग्य ती पावले सरकारकडून उचलली न गेल्यास हा धगधगता अग्नी लवकरच ज्वालामुखी होऊन बाहेर पडण्याची शक्यता टाळता येत नाही. मुकद्दर का सिकंदर व्हा पण संधी हातातून निसटणे परवडणारे नाही. हलगर्जीपणा आता पाप ठरेल, दुर्लक्ष करणे महागात पडेल.