Friday, April 17, 2015

सुमंत सर कालवश


पुणे विद्यापीठातील राज्यशास्त्राचे प्राध्यापक हीच फक्त सुमंत सरांची ओळख नव्हती तर सरांचे मार्गदर्शन हे त्याही पलिकडचे होते. राजकीय विश्‍लेषक म्हणूनही सर जरी प्रसिद्ध असले तरी प्रत्येक राजकीय घटनेला-बाबीला कायमच तथाकथित गल्लाभरू राज्यशास्त्रीय नियम-सूत्रे व समिकरणे लावण्याचा पायंडा मोडीत काढत, सुमंत सर आंतरविद्याशाखिय दृष्टिकोनातून घटनेची मीमांसा करीत असत. सरांनी काही वेळा इतरांच्या आग्रहाखातर नाट्यपरीक्षणापासून चित्रपट समीक्षणही प्रायोगिकरीत्या करण्याचा प्रयत्न केला. ह्या सगळ्यातूनही सरांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा विद्यार्थ्यांशी असणारा सलोखा व दांडगा संपर्क. सरांनी एखादा मुद्दा पटवल्यावर तो त्या विद्यार्थ्याला समजला नसावा. असा एकही विद्यार्थी सापडणे कठीण होते. सुमंतसर फक्त विद्यापीठातल्याच विद्यार्थ्यांमध्ये प्रसिद्ध नव्हते. तर ते बाहेरील कला शाखेत शिक्षण घेणार्‍या मुला-मुलींपासून थेट आमच्यासारख्या अभियांत्रीकीय शिक्षण घेणार्‍यांपर्यंत प्रसिद्ध होते.

सुमंत सरांकडे आपले प्रश्‍न घेऊन जाणारा विद्यार्थी कधीही निराश होऊन परतत नसे. मग ते प्रश्‍न राज्यशास्त्रविषयक असो किंवा अगदी वैयक्तिक जीवनातीलही. अवघड बाब सोप्या भाषेत कशी मांडावी हे सरांकडून शिकायला मिळाले. सरांना अधिक चिंता असायची ती राजकीय पटलावर होणार्‍या पुरोगामित्व व संस्कृतीची अनपेक्षित सरमिसळीची. तसेच जात, धर्म ही शोषणाची दमणकारी व्यवस्था आहे. व ती बदलण्यासाठी अजूनही ही सामाजिक परिवर्तनाच्या चळवळींनी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे असे त्यांचे परखड मत होते. डाव्यांना सुमंत सर डावे वाटत असत तर उजव्यांना उजवे.

‘कार्यकर्ते म्हणजे अनुभवाचे जिवंत भांडार असते. वाचनासोबत प्रत्यक्ष अनुभवांची साथ असल्याने हे सगळे शब्दबद्ध झाल्यास अनुभवांचे शास्त्र होईल. ह्या शास्त्राचे रूपांतर परिवर्तनाच्या हत्यारात होईल. त्यामुळे सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांनी लेखन सुरुच ठेवले पाहिजे’ असे त्यांचे मत होते.

सुमंत सरांच्या ज्ञानजिज्ञासाची आस सर्वश्रुत होती. त्यांना वाचनाची अफाट सवय होती हे वेगळं सांगायला नको. सरांकडून अगदीच दुर्मिळ आणि वेगवेगळ्या पुस्तकांची माहिती मिळे. ती पुस्तके जमवून वाचणे हा छंदच जडला होता. त्यातून ज्ञानात भर पडत असेच पण ‘Enlightened’ व्हायला होई. सुमंत सरांची वैचारिक जडणघडण ही डाव्याविचारसरणींनी प्रभावित होऊन झाली. मूळचे धुळ्याचे असणारे कॉ. शरद पाटील यांच्या तालमीत सर काही काळ होते. व पाटील यांच्या अनेक चळवळींतही त्यांनी सहभाग घेतला होता. कालांतराने सर गांधीविचारसरणीकडे वळले. महाराष्ट्रात गांधीवादाची फेरमांडणी त्यांनी केली. डॉ. आंबेडकरांचेही विचार त्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात पाठविले. राज्यशास्त्राचे प्राध्यापक असल्याने त्यांनी आंबेडकरांभोवतीची दलित चौकट फोडण्याचा प्रयत्न केला व त्यापलिकडेही असलेली बाबासाहेबांची विद्वत्ता त्यांनी लोकांपर्यत पोहचवली. आंबेडकर सर्वांसाठी होते, आहेत, व राहतील हे ते आवर्जून सांगत.
गांधी, टिळक, आगरकर व आंबेडकरांपासून सरांवर अल्बर्ट कामूस, एरिक हॉब्सवॅम, मार्क्स, रॉल्स, रूसो, अगदी मकायव्हॅलीपर्यंत सगळ्यांचा प्रभाव होता. सर हे लोकशाहीचेही कट्टर समर्थक होते. अ‍ॅरिस्टोटल-प्लेटो-सॉक्रेटस हा त्यांचा अगदी जिव्हाळ्याचा विषय.
अशा प्रकारे सरांनी अनेकांना विवेकवादाचेही धडे दिले. आपल्यातला ‘Rationale’ मरू देऊ नका असे ते कायम म्हणत. नेमक्या शब्दांत म्हणणे मांडणेही सरांनीच शिकवले.
अशा Friend-Philosopher, Teacher असणार्‍या यशवंत सुमंत सरांना भावपूर्ण श्रद्धांजली!

Thursday, April 2, 2015

ली कुआन यु‘उवाच’-(भाग 1)


पुस्तकाचे नाव : Conversations with Lee Kuan Yew (How to Build Nation)लेखक- संकलक- Tom Plate.प्रकाशक- Marshall Cavendish


गेल्या दोन महिन्यांपासून सिंगापूरनिर्माते ली कुआन यु माझ्या रोजच्या जगण्यातील एक भाग झाले होते. 23 मार्चला मध्यरात्री 2:30 वाजता त्यांचा देहांत झाल. गेल्या दोन महिन्यांपासून टॉम प्लेट लिखित ह्या पुस्तकाचे वाचन चालू असल्याने ली गेल्यावर आपलेच कुणीतरी गेले असे वाटले. ली ह्यांचे व्यक्तिमत्त्वच तसे होते. टॉम प्लेट हे एक अमेरिकन पत्रकार आहेत. त्यांनी ‘जीएंट्स ऑफ एशिया’ ह्या पुस्तकांतील शृखंलेतील एक पुस्तक लींवर असावे असे ठरवले. हे पुस्तक म्हणजे मुलाखतीसारखे आहे. टॉम प्रश्‍न विचारतात-ली उत्तर देतात. परंतु अगदीच तोडके-तुटक वाटू नये व सलगता राहावी म्हणून टॉम प्रश्‍न विचारण्यापूर्वी विश्‍लेषण देतात. ज्याने वाचकाला प्रत्येक संकल्पना स्पष्ट होण्यास मदत होईल.

मलेरियाग्रस्त असा सिंगापूर ज्याचा अवघ्या तीन वर्षात कायापालट होणे हा चमत्काराच आहे. ‘सिंगापूर’हा एक सिनेमा आहे. अतिशय रोमहर्षक, गूढ, अ‍ॅक्शन, गंभीर असा हा सिनेमा आहे. ज्याचा नायक-खलनायक व दिग्दर्शकही एकच आहे. ली कुआन यु. सिंगापूर 1967 साली मलेशियापासून वेगळा झाला. सिंगापूरची जमीन म्हणजे उजाड. दुर्दैव हे की एकही नैसर्गिक संपत्तीची स्वरूपात देणगीही नाही. निसर्गही सोबत नाही. काढला आणि  फेकला अशी हालत झालेल्या सिंगापूरला गरज होती ती एका मसीहाची. ह्या मसीहा स्वरूपात आले ते 'Soft Authoritarian'  ली कूआन यु. आणि बघता बघता असा काही पालटला सिंगापूर की अमेरिकेसकट चीनला तोंडात बोटे घालावी लागली. काही ठिकाणी ली पुजले गेले तर काही ठिकाणी विशेषतः पश्‍चिमेला लींवर कडाडून टीका झाली. तरीही पुस्तक छपाईला जाण्यापूर्वी ली टॉम यांना सांगतात.

" Tom, the book will have to have critical and negative stuff in it. I Know, don't worry about me. Just write me up exactly as you see me. Let the chips fall where they may. Tell the true story of me, as you see it. That's all I ask.''

ली आपल्या राजकीय जीवनात जेवढे आक्रमक आहेत तेवढे ते खासगी जीवनात वाटत नाही असे प्लेट म्हणतात. ली त्यांच्या  Machiavellian Maneuvering म्हणजेच आपल्या विरोधकांना राखेत रूपांतरित करण्यासाठी प्रसिद्ध होते.आहेत. 23 मार्चपर्यंत वयाच्या 91 व्या वर्षीही 'Minister Mentor' म्हणून काम पाहत होते. मुलाखत देतानंाही लींची स्वतःची एक वेगळी शैली आहे. हातवारे करण्याची वेगळीच पद्धत आहे जी मुलाखत घेण्यार्‍यालाही मोहीत करते. म्हणूनच लींची मुलाखत घेणे किती क्लिष्ट व अवघड आहे ह टॉम सांगतात.

संपूर्ण पुस्तकात लींना प्रश्‍न विचारत टॉमने चौफेर फटकेबाजी करण्यास भाग पाडले आहे. लींना त्यांच्यावर होणार्‍या टीकेवर विचारले असता ली म्हणतात, ‘‘प्रशंसा तुम्हाला कुठेही घेवून जात नाही. फक्त तुम्हाला खालीच खेचत असते. तुम्हाला तुमच्या ध्येय्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करते. माझ्यासाठी टीकाच खूप उपयुक्त ठरते. जी मला ध्येय्याप्राप्तीसाठी सतत जळत ठेवले.’’  पुढे पाश्‍चात्यांच्या टिकेवर ते म्हणतात, "Well, I think what the western world readership does not understand is that at the end of the day, I am not worried by how they judge me. I am worried by how the people I have governed judge me.''


त्यांचे उत्तराधिकारी गोह चोक टोंग यांना मिळालेल्या यशाविषयी आनंद व्यक्त करत त्यांचे करत त्यांचे यश हे माझी क्षमता दाखवून देते असे ली म्हणतात.

ग्रीक साहित्यातील साळिंदर व कोल्ह्याची कथा सांगत टॉम ली यांचे महत्त्व स्पष्ट करून देतात. कोल्ह्याकडे जगण्यासाठी खूप काही गोष्टी असतात. एकात अपयश आले तरी इतर अनेक मार्ग त्याच्याकडे असतात. परंतु साळिंदरकडे एकच असे प्रभावी कारण असते ज्याच्यावर तो आपले संपूर्ण जीवन जगतो. टॉम म्हणतात कोल्ह्याप्रमाणे ली यांनी अनेक पर्याय अनुभवून बघितले. प्रयोग केले. व जनतेला असे एकच कारण दिले की त्यांचे जीवन सुरळीत होवो. हेच खरे नेतृत्व.

टॉमशी बोलतांना ली अनेक विचारधारांवर भाष्य करीत आपले काही स्वतःचे तत्त्वज्ञानपर अनुभवांवर आधारित सिद्धांत सांगतात. माओ, डेंग झिओपिंगपासून ते रोनाल्ड रेगनपर्यंत या सर्वांविषयीचे आपले मत ली सांगतात. विकास कसा साधला जातो हेही ली कुआन यु सांगतात. हे सगळे पुढील भागात पाहूयात.

‘अज्ञात गांधी’

नारायणभाई देसाईंचे ‘अज्ञात गांधी’ हे ‘समकालीन’ प्रकाशित पुस्तक काही महिन्यांपूर्वी वाचनात आले. बापूंचे विचार तरुणांपर्यंत पोहोचावेत म्हणून नारायणभाईंनी गांधीकथा सांगायला सुरुवात केली. देशांतल्या अनेक गावोगावी फिरत त्यांनी गुजराती, हिंदी, इंग्रजी, आसामी व बंगाली अशा अनेक भाषेत व्याख्याने सुरू केली. भारतातच नव्हे तर भारताबाहेरही कथा त्यांनी सांगितल्या. ह्या सर्व कथांचे संकलन म्हणजे ‘अज्ञात गांधी’ हे पुस्तक.

गांधीजींच्या जन्मशताब्दीनिमित्ताने ग. दि. माडगूळकरांनी रचलेल्या ‘बापू सांगे आत्मकथा’ ह्या गीतापासून प्रेरणा घेत नारायणभाईंनी कथाकथनास सुरुवात केली. ह्या पुस्तकाचे मराठीत रूपांतरण सुरेशचंद्र वारघडे यांनी केले आहे.

‘अज्ञात गांधी’ पुस्तकातून खरोखरच सामान्य जनांत अज्ञात असलेले गांधी समोर येतात. गांधीच्या जीवनातील आणखी नवनवीन पैलू उलगडत जातात. गांधीच्या दांडग्या जनसंपर्कामागील रहस्य ह्या पुस्तकातून कळते. त्यांच्या जीवनातील काही रोमांचक किस्से कळतात. अहिंसेच्या मार्गावर आपले संपूर्ण जीवन व्यतीत केलेल्या गांधीजींचा निर्भीड, भेदक व परखड स्वभाव ह्यातून कळतो.

उत्तमचंद गांधी म्हणजे गांधीजींचे आजोबा. त्यांना सगळे ‘ओता’ गांधी ह्या नावाने ओळखत. पोरबंदर संस्थानचे जकात अधिकारी म्हणून ते काम पाहत. पोरबंदर संस्थान व जुनागडचा नवाब यांच्यातील सीमावाद मिटवण्यात ओता गांधींचा बराच मोठा वाटा होता. दोन्ही संस्थानात मित्रत्वाचे नाते निर्माण केले. याने पोरबंदरचा राणा खूष झाला व ओतांची नेमणूक दिवाणपदी केली. 1831 साली पोरबंदरचा राणा मरण पावला. त्याची पत्नी रूपाली अधिकारपदावर बसली. राणी कानाने हलकी असल्याने बर्‍याच लोकांनी गैरफायदा घेतला. खजिनदार खिमजींकडे काही दासींनी अधिक पैशांची मागणी केली. सगळा हिशोब ओतांकडे होता. त्यांच्या परवानगीशिवाय कुठलाही व्यवहार होत नसे. खिमजीने दासींची ही अवाजवी मागणी फेटाळली. दासींनी रूपालीचे कान भरले व खिमजीला तुरुंगात डांबण्याचे फर्मान काढले. त्याने खिमजी आश्रयाला ओतांच्या घरी धावला. ओतांनी आपल्या सगळ्या कुटुंबियांना खिमजीभोवती वर्तुळ करून बसण्यास सांगितले व खिमजीला धक्काही लागण्याअगोदर आमच्या प्राणांवर चालून जावे लागेल असे बजावले. याने रूपाली नरमली. खिमजीला सोडले पण ओतांची संपत्ती घरदार जप्त केले.

येथूनच महात्मा गांधीची शरणागत निरपराध माणसासाठी बलिदान देण्याचे धडे गिरवण्यास सुरुवात झाली.
त्यानंतर ओता गांधींना जुनागढच्या नवाबाने पाचारण केले. तेथे गेल्यावर ओता गांधींनी नवाबाला ‘डाव्या’ हाताने सलाम केला. तेव्हा नवाबाने उजव्या हाताने सलाम करण्याचे संकेत मोडून डावा हात वापरल्याचे कारण ओतांस विचारले. त्यावर ओतांचे उत्तर मोठे विहंगमय होते. ते म्हणाले, ‘उजवा हात अद्यापि पोरबंदरच्या सेवेत अडकल्याने डाव्या हाताने सलाम केला.’ यावर खुश होत नवाबाने त्यांना महालाचे दरबारीपद देऊ केले.
1841 साली रूपालीचे निधन झाले. त्यानंतर गादीवर आलेल्या तिच्या मुलाने ओतांना पुन्हा बोलावणे पाठवून दिवाणपद देऊ केले. परंतु ते नाकारून त्यांनी आपला स्वाभिमान जपला. परंतु मग राणीने त्यांचा कुशाग्र मुलगा करमचंदला दिवाण बनवले.

अशा अनेक घटनांमुळे गांधींची जडणघडण होत गेली. राजकोटच्या ठाकोरच्या दरबारीही गांधी परिवाराने आपली सत्यनिष्ठता व निर्भयता दाखवली. करमचंद म्हणजे कबा गांधीनीही वाकानेरच्या संस्थानात आपली स्वच्छ व पारदर्शक वृत्तीचे दर्शन घडवले. वाकानेरच्या संस्थानिक कबांना दहा हजारांची बक्षीसरूपी लाच देतांना म्हटले, ‘‘दिवाणसाहब, शर्त भंग की बात छोड दो। थोडा सोच लो। आपको दस हजार देनेवाला मेरे जैसा कोई नही मिलेगा।’’ त्यावर कबा उत्तरतात, ‘‘आपको मेरे जैसा दस हजार ठुकरानेवाला कभी नही मिलेगा।’’
चंपारण्य लढ्याच्यापूर्वी दोन ते तीन वर्षे अगोदर कुठलातरी एक साधा शेतकरी काँग्रेस अधिवेशनात आलेला असता आपली व्यथा कुणापुढे मांडावी ह्या गोंधळात अडकतो. तेव्हा त्याला आजूबाजूचे सगळे उंची कोट परिधान केलेले तसेच पांढरी स्वच्छ घातलेले लोक दिसत होते. ही लोक आपली व्यथा ऐकतील का? असा प्रश्‍न त्याला पडतो मग त्याला एक काठीयावाड पगडी घातलेला अंगावर साधा सदरा व धोतर घातलेला अगदी आपल्यातलाच वाटणारा माणूस दिसतो. तो त्या व्यक्तीजवळ जाऊन त्यांना आपली व्यथा सांगायला परवानगी मागतो. तेव्हा काठियावाड वेशातील गांधी हसत त्याला सांगतात, ‘मी तुमच्यासाठीच येथे आलोय.’ तेव्हा तो शेतकरी अतिशय भांबावतो व गांधीजींच्या पाया पडत ढसाढसा रडतो. गांधीजींच्या शब्दांनी सुखावलेला तो माणूस त्यांना चंपारण्यातील ब्रिटिशांच्या जुलुमाविषयी कळवतो व गांधींकडून आश्‍वासन घेऊन परततो आणि गांधीजी काही काळाने खरंच तेथे जाऊन ठेपतात त्यानंतरचा लढा व गांधीजींची निर्भयता ही अतिशय मोहनीयरीत्या पुढे मांडलेली ह्या पुस्तकात आढळते.

गांधीजी कसं संपूर्ण जगाला आपलंसे करत होते व सारे जग कसे गांधींवर प्रेम करायला लागले, याची प्रचिती देणारे पुस्तक म्हणजे अज्ञात गांधी. गांधीवर अनेक प्रकारचे उथळ आरोप करणारी लोके भारतात आजही आहेत.

त्याविषयीची द्वेषभावना आजही आहेच. मात्र या सगळ्या लोकांचे मत परिवर्तन करण्याची क्षमता ह्या पुस्तकात नक्कीच आहे. महात्माजींचा हृदयपरिवर्तनावर केवढा विश्‍वास होता हे सांगण्याचंही काम हे पुस्तक करतं. आफ्रिकेत गांधींवर हल्ला करणार्‍या मीर आलमपासून ते गुरुदेव टागोरांना अचंबित करणारे गांधीजी ह्या पुस्तकातून आपल्या समोर येतात.

नारायणभाईंनी इक्वेडोर देशात भेटलेला माणूस शेकहॅण्डसाठी दिलेला हात सोडायला तयार होत नाही. कारण महात्माजींच्या सहवासात राहिलेल्या माणसांच्या हातातून तो गांधीच्या स्पर्शाची लहर अनुभवायची म्हणून असे करतो हे वाचून आश्‍चर्यचकित झाल्यावाचून राहवत नाही. तसेच अमेरिकेतील अहिंसावादी नेता सीझर चावेज आपली सगळी कामे रद्द करून नारायणभाईंच्या सहवासात चर्चा करत राहिला हे व असे अनेक प्रसंग महात्म्याचे माहात्म्य सांगून जातात. काही प्रसंग तर डोळ्यात पाणी आणणारे आहेत.

नारायणभाईंनी राजकीय महात्मा लोकांसमोर न मांडता लोकनेता व दयाळू, नम्र, जिंदादिल असे गांधीजी मांडण्याचा प्रयत्न ह्या पुस्तकातून केला आहे. गुरुदेव टागोरांपासून आंबेडकर, नेताजी बोस ह्या सगळ्यांशी असणारे सलोख्याचे नाते कसे नारायणभाई सांगतात.

कॉपीराईटस्मुळे सगळे प्रसंग इथे मांडण्याला मर्यादा पडते. वरील नमूद केलेल्या प्रसंगांपेक्षाही अधिक अचंबित करणारे प्रसंग पुस्तकात वाचायला मिळतील. प्रत्येकाने गांधीवाद्यांनी गांधीविरोधकांनी व अगदी उजव्या-डाव्यांसकट नक्षलवादी दहशतवाद्यांनीही वाचावे असे हे पुस्तक आहे.